मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस सोमवारी (4 नोव्हेंबर) रोजी संपुष्टात आलाय. यानंतर आता कोण कुठून लढणार, याचे चित्र स्पष्ट झालंय. दरम्यान, काही बंडखोर निवडणुकीवरती ठाम असल्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढलीय. दुसरीकडे मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालीय. प्रचारात सत्ताधारी-विरोधक आरोप-प्रत्यारोपांची फैरी झाडताहेत. यामुळं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगतोय. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ हा मागील काही दिवसांपासून अनेक कारणामुळं चर्चेत असून, इथे तिरंगी लढत होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवताहेत. महायुतीकडून शिवसेना (शिंदे गटाचे) सदा सरवणकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उबाठाचे महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे इथे कोण बाजी मारणार? याकडे मुंबईसह महाराष्ट्राचे लक्ष लागलंय. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी "ईटीव्ही भारत"ला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी आपण निवडून आल्यानंतर कोणती कामं करणार? याबाबत सविस्तर माहिती दिलीय.
उद्धव साहेबांचा विश्वास सार्थ ठरवणार : महेश सावंत यांनी "ईटीव्ही भारत"ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे बाजूलाच शिवसेना भवन असून, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मागील लोकप्रतिनिधींनी कोणतीही कामं केलेली नाहीत. इथे जरी दोन दिग्गज उमेदवार असले तरी आपणच विजयी होणार, असा विश्वास यावेळी महेश सावंत यांनी व्यक्त केलाय. एक साधा शिवसैनिक अन् शाखाप्रमुखाला उद्धव साहेबांनी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिलीय. दुसरीकडे जरी ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात असला तरी माझ्यावर कोणताही दबाव नाही. उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन इथे उमेदवार दिलेला आहे. विधानसभा निवडणूक असल्यामुळे आम्ही पूर्ण तयारीशी निवडणुकीत उतरणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांनी येथे जोर लावलाय. माझ्यावर उद्धव साहेबांचा आशीर्वाद आहे. शिवसैनिकांचा उत्साह आहे. त्यामुळं आपणच निवडून येणार आणि उद्धव साहेबांचा विश्वास सार्थ ठरवणार, असंही यावेळी महेश सावंत यांनी सांगितलं.
अनेक प्रश्न मार्गी लावणार : माहीम विधानसभा मतदारसंघ हा मुंबईतील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघाची महाराष्ट्रसह देशभर चर्चा आहे. त्यामुळं मी स्वतःला भाग्यवान समजतोय की, उद्धव साहेबांनी माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. मागील लोकप्रतिनिधींनी येथे कामं केली नाहीत. ती मी कामे निवडून आल्यानंतर आपण करणार आहोत. त्यात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न आहे. सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्याचबरोबर अनेक मतदारांचे प्रश्न आहेत. ते प्राधान्याने मी मार्गी लावणार असल्याचं महेश सावंत यांनी सांगितलंय. तसेच 23 तारखेला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि मीसुद्धा निवडून येणार आहे. आमच्या पक्षाची जी मशाल आहे आणि मशालीचा प्रकाश महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे, असा विश्वास यावेळी महेश सावंत यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा -