बारामती - कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये गर्भवती माताही मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. यादरम्यान, कोरोनाबाधित झालेल्या 40 गर्भवती मातांना कोरोनामुक्त करण्यात बारामतीतील डॉक्टरांना यश आले आहे. विशेष म्हणजे एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा सीटीस्कॅन स्कोर १४ असतानाही तिची यशस्वी प्रसूती करून तिला कोरोनामुक्त करण्याची किमया बारामती येथील चैतन्य टेस्टट्यूब बेबी सेंटरचे संचालक डॉ.आशिष जळक यांनी साधली आहे.
नऊ महिन्यांची गर्भवती कोरोनामुक्त -
फलटण तालुक्यातील एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. तिचा सीटीस्कोर १४ आला होता. तिला त्रास होऊ लागल्याने ती विविध रुग्णालयात गेली. मात्र, तिला उपचार मिळू शकले नाही. दरम्यान, गर्भवतीच्या नातेवाईकांनी बारामतीतील डॉ.जळक यांच्याकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार या गर्भवतीला तत्काळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध तपासण्या करत तिच्यावर उपचार करून तिला कोरोनामुक्त करण्यात आले. येथेच या महिलेची यशस्वी प्रसूतीदेखील करण्यात आली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. आशिष जळक यांनी दिली.
'लहान मुलांना 'इन्फ्लो इंजा' लस द्यावी' -
अनेक तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तीसऱ्या लाटेशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही तिसऱ्या लाटेचा सर्वाच जास्त धोका लहान मुलांना आहे. अशा परिस्थितीत पालकांनी लहान मुलांना शक्यतो बाहेर पडू देऊ नये. तसेच जवळच्या बालरोग तज्ञांकडून लहान मुलांना 'इन्फ्लो इंजा' ही लस द्यावी. ही लस दिली तर काही प्रमाणात लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित ठेवले जाऊ शकते, असेही डॉ.जळक यांनी सांगितले.
'गरोदर मातांनी सकस आहार घ्यावा' -
सध्या कोरोनावर कोणतेही रामबाण औषध उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत गरोदर मातांनी प्रचलित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर करावा. तसेच आहारामध्ये दूध, अंडी, पनीर, कडधान्य आदी प्रथिने युक्त पदार्थांचा वापर करावा. शक्य झाल्यास सूर्यनमस्कार, योगासने करावीत, असे आवाहन डॉ. जळक यांनी केले.
हेही वाचा - मुंबईच्या जोगेश्वरी ओशिवरा येथील आशियाना इमारतीला आग