पुणे - जगात देव दिसत नाही मात्र ज्यावेळी रुग्ण रुग्णालयात असतो त्यावेळी रूग्णाचे जीव वाचवण्यासाठी डॉक्टरच त्याच्यासाठी देव असतो. मात्र जर हेच देवाच्या रुपात येणारे डॉक्टरांकडूनच हलगर्जीपणा होऊन रुग्णांचे बळी जात असल्याच्या घटना वाढत आहेत. गरोदर मातेसह बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची आणखी घटना चाकणमध्ये उघडकीस आली. ६ दिवसातील चाकण, पिंपरी-चिंचवड परिसरातली ही तिसरी घटना आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हे मृत्यू झाल्याचा आरोप संबधित रुगणाच्या नातेवाईकांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
धनश्री जाधव, सोनम आणि सपना पवळे यांच्या गर्भातील अर्भक या तिघांनाही गमावल्याच्या दुःखात असलेल्या या नातवाईकांकडे आता आक्रोश आणि संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीही उरले नाही, पिंपरीतल्या याच आयुर्वेद रुग्णालय स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये दातांवर शस्त्रक्रिया करताना अतिरक्तस्त्राव झाल्याने धनश्रीचा मृत्यू झाला, तर गर्भवती असल्याने चाकणच्या या नामांकित आरगडे रुग्णालयात दाखल झालेल्या सपना याचाही उपचारादरम्यान आपल्या पोटातल्या बाळासह मृत्यू झाला. हे सगळे मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे बळी असल्याचे आरोप नातवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी धनश्रीवर उपचार करणारे दंत चिकित्सक डॉक्टर राहुल पाटील यांच्या बाबतचा अहवाल मागवला. तर स्टर्लिंग हॉस्पिटल व्यवस्थापनाने दंत्त विभागाला सील केले. तर, सपनावर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांविरुद्ध चाकण पोलिसांनी गंभीर गुन्ह्याची नोंद केली. मात्र दोन्ही प्रकरणातील डॉक्टरांनी आपल्यावरील आरोप फेटाळात रुग्णांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.
खर तर डॉक्टरांना देव मानले जाते, मात्र अशा देवांकडूनही वारंवार जीवघेण्या चूका घडणार असतील, तर या देवांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे सहाजिक आहे, त्यामुळे खरच जर हे मृत्यू हलगर्जीपणाचे बळी ठरले तर मेडिकल काऊन्सिल अशा देवाचे देवपण रद्द करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.