पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे आज सकाळी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ असलेल्या वढु-तुळापुर येथे नतमस्तक झाले. यावेळी शिवशंभु भक्तांच्या विचारातून वढु तुळापुरला विकास आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरुर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हेंनी विजय मिळवल्यानंतर संपूर्ण मतदार संघात जल्लोष पहायला मिळाला. असे असताना विरोधकांनी हा विजय छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, असे सांगितले. तर डॉ. अमोल कोल्हेंनी मी छत्रपतींचा मावळा असल्याचे सांगत पहिले शिवनेरीवर नतमस्तक झाले. तर आज सकाळी ते छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळी नतमस्तक झाले.
छत्रपतींच्या विचारातुन शिरुर लोकसभा मतदार संघाला तरुण नेतृत्व मिळाले आहे. जनतेच्या मनातील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गड किल्ले,संवर्धन, शिवश्रृष्टी, बलिदानस्थळ अशी छत्रपतींची धार्मिक स्थळे चांगल्या पद्धतीने उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी डॉ. कोल्हेंनी सांगितले.
आपले दैवत शिवशंभु मानत डॉ. कोल्हेंनी मतदार संघातील दौरा सुरु केला. शिवशंभुंच्या बलिदानस्थळी नतमस्तक होऊनच ते पुढील दौऱ्यात सहभागी झाले.