पुणे - विठ्ठल्याच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज पुण्यात आगमन झाले. यावेळी लाखो वारकऱ्यांचा जनसागर पालखीबरोबर होता. पुणेकरांनी माऊलींच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. हा देखणा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी पुणेकरांनी एकच गर्दी केली होती.
आज संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रथेप्रमाणे पुण्यात मुक्काम होणार आहे. तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. सुरक्षेच्या दृष्टिने पुण्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदीहून काल पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. दरम्यान मृदुंगाच्या गजरासह हरिनामाच्या जयघोषात अलंकानगरी दुमदुमून निघाली.