पुणे - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गातील सर्वात अवघड असणाऱ्या दिवेघाटाचा रस्ता लाखो वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पार केला. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वरूणराजानेही आवर्जून हजेरी लावली होती.
निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या दिवेघाटातून पालखी जाताना वारकऱ्यांच्या दिंड्यांचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरील दिवे घाट हा सर्वात खडतर मार्ग आहे. परंतु, हाच खडतर मार्ग आता माऊलींच्या पालखीने पूर्ण केला आहे. गुरुवारी दिवसभर पुण्यात विसावा घेतलेल्या दोन्ही पालख्या आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. दिवे घाटातील हा सोहळा पाहून डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.