पुणे - जुन्नर तालुका मित्र मंडळाचे संस्थापक राणोजी शिंदे यांचा दशक्रिया विधी आज पार पडला. यावेळी जुन्नर तालुका मित्र मंडळाकडून पुष्पावती नदी घाटावर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
शिंदें हे उदापूरचे रहिवासी असून त्यांचे समाजाप्रती असणारे योगदान खुप मोठे होते. तसेच त्यांच्या आठवणी मरणानंतर चिरंत्तर रहाव्यात, यासाठी पर्यावरण रक्षणातून मंडळाने फळझाडांचे वाटप करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी नागरिकांनी शिंदे यांची आठवण म्हणून ही झाडे जगवण्याचा संकल्प केला.
सुरूवातीच्या काळात जुन्नर तालुक्यातील पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात राहणाऱ्या लोकांचे त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत संघटन केले. त्यांनी जुन्नर तालुका मित्रमंडळाचे कोषाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती. मंडळाच्या माध्यमातून वधू-वर सुचक मेळावे घेणे, यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, मंडळाचे विभागवार मेळावे घेणे, यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सहकाऱ्यांच्या मदतीने राबवण्यात शिंदेंचा सिंहाचा वाटा होता. पिंपरी चिंचवडमध्ये गणेशोत्सवामधील देखावे, सजावट स्पर्धेमध्ये अनेक वर्षे त्यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या या कला क्षेत्रातील योगदानाने अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.