पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने एकूण 12 जण बाधित आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाकडून शहरात निर्जंतुकीकरण करणे सुरू आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत हे काम सुरू असून अग्निशमन वाहनांनी याची फवारणी केली जात आहे.
दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोना बाधित आढळलेला नाही. कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये, हे लक्षात घेता आरोग्य विभागाने हा उपक्रम हाती घेतला असून सोडिअम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्सची फवारणी करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 12 कोरोना बाधित आढळल्यानंतर शहरातील प्रशासन खडबडून जाग झाले आहे. शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालय येथे कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, 12 पैकी 8 रुग हे ठणठणीत बरे झाले असून 3 जणांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले आहे. तर रविवारी 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर कोरोना बाधित, संशयित आणि परदेशातून आलेल्या नागरिकांच्या इमारतीमध्ये, परिसरात सोडिअम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्सची फवारणी करण्यात आली आहे. तसेच शहराच्या इतर भागात देखील पुढचे 3 दिवस ही फवारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या काळात बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.