पुणे : भारतात क्रिकेटला धर्म मानला जातो आणि या क्रिकेटसाठी अनेक दिवाने आपण पाहिले आहे. मागच्या महिन्यात झालेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत भारतात तसेच आपल्या राज्यातील प्रत्येक ठिकाणी फुटबॉलचे चाहाते पाहायला मिळाले. आता सर्वसामान्य नव्हे तर दिव्यांगांमध्ये देखील फुटबॉलची क्रेझ वाढली आहे. आज पुण्यातील सीओईपी मैदानावर दिव्यांग मुलींनी फुटबॉल कौशल्याचे दर्शन घडविले.
गुरू तेजबहादूर फांडेशन : गुरू तेजबहादूर फांडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या २१व्या गुरू तेजबहादूर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील आजचा दिवस उपस्थितांना आगळावेगळा आणि संस्मरणीय अनुभव देणारा ठरला. सीओईपी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज देहूरोड येथील माई बालभवन संस्थेतील सात दिव्यांग मुलींनी फुटबॉलमधील आपल्या असाधारण कौशल्याचे दर्शन घडवत उपस्थितांना थक्क करून सोडले. या मुलींनी प्रथम एक सराव सामना खेळताना फुटबॉलवरील नियंत्रण, तसेच आपल्यातील स्पर्धात्मकताही दाखवून दिली.
दीपाली कांबळेची उपस्थिती : यातील काही मुलींनी स्वतंत्रपणे फुटबॉलमधील काही विशेष कौशल्यांचे दर्शन घडविताना उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या दिव्यांग फुटबॉलपटूंमध्ये महाराष्ट्राची कर्णधार दीपाली कांबळे हिच्यासह कोमल गायकवाड, भाग्यश्री रुगी, दीपाली पवार, राणी लोहार, स्वाती माने व सोनाली रोडे यांचा समावेश होता. फुटबॉल खेळताना या सर्व सहभागी खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
खेळाडूंना प्रोत्साहन : याशिवाय खास बाब म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोची येथे पार पडलेल्या भारत विरुद्ध जपान या आंतरराष्ट्रीय सामन्यात दीपाली कांबळे, कोमल गायकवाड व भाग्यश्री रुगी या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आजच्या सराव सामन्यासाठी माई बालभवन संस्था, देहू रोड, पुणे या संस्थेचे संस्थापक मधुकर इंगळे आणि अन्य मान्यवरांनी मैदानावर उपस्थित राहून दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन दिले व त्यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा : Uorfi Javed vs Chitra wagh : चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फिला चौकशीसाठी बोलावले