राजगुरुनगर (पुणे) - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या राजगुरुनगर येथील जन्मस्थळ असलेल्या राष्ट्रीय स्मारकात दिपावली निमित्ताने पाडव्याच्या मुहूर्तावर जाणीव परिवार या युवा संघटनेच्या वतीने "एक दिवा हुतात्म्यांसाठी" या उपक्रमातून दीपोत्सव साजरा करत करण्यात आला. यावेळी सर्वत्र हजारो दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळाला.
सहा वर्षांपासून दीपोत्सव
राजगुरुनगर येथील जाणीव परिवार ग्रुपच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात दीपावलीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला. शहरातील नागरिक विशेषतः तरुण-तरुणी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी, राजगुरू परिवारातील वंशज विलास राजगुरू यांनी या उपक्रमाला भेट दिली. मयूर पाचारणे यांनी बासरी तर संदीश शिंदेकर यांनी ढोलकी वादन करीत देशभक्ती व भावगीते सादर केली.
यंदा दिपावली सणावर कोरोना महामारीचे संकट असल्याने दीपावली सर्वत्र साधेपणात साजरी करण्यात आली. मात्र, आपल्या गावातील हुतात्म्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली. त्या क्रांतिकारकाचे स्मरण म्हणून राजगुरुनगर येथे राजगुरु वाड्यावर मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
'एक दिवा हुतात्म्यांसाठी'
या जाणीव परिवार ग्रुपच्या आवाहनाला शहरातील युवक-युवतींनी मोठा प्रतिसाद दिला. शहरातील असंख्य नागरिक दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. जाणीव परिवारातील अतिक सय्यद, अमोल वाळुंज, शैलेंद्र बकरे, अजिंक्य बकरे, ऋषिकेश सारडा, रोहित बेलसरे, श्रेयस अहिरे, ओंकार कहाणे, सौरभ लुणावत, प्रसाद निंबाळकर, हितेश शेटे, अभिजीत घुमटकर, संदीश शिंदेकर, सुमित खन्ना, सुजित डावरे, श्रीराज चव्हाण, अमर टाटिया, मच्छिंद्र राक्षे, अभिजीत तापकीर, मयूर पाचारणे, रोहित बोरुडे यांनी संयोजन केले.
हेही वाचा - मंदिरे सुरु : भाजपाच्या वतीने ढोल ताशे वाजवत महाद्वार चौक येथे आनंदोत्सव