पुणे - आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव माळीमळा येथील कठडा नसलेल्या विहिरीत नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला आहे. बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शिकारीच्या मागे धावत असताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात माणूस लॉकडाऊन असताना बिबट्या मुक्तसंचार करत असताना आज बिबट्याच्या मृत्यूची दुदैवी घटना घडली आहे. नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात बिबट्याच्या संगोपनासाठी वनविभागाने स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी यावेळी केली जात आहे.
सुदाम व देवराम किसन वाव्हळ यांचे पारगाव माळीमळा येथील विहिरीत तीन ते चार दिवस आगोदर नर जातीच्या दोन ते अडीच वर्षाचा बिबट्या शिकारीच्या शोधात पाठलाग करत असताना विहिरीला कठडे नसल्याने पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाने बिबट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आहे.