पुणे - देशावर येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांनी राजगुरुनगरकरांना एक वेगळ्या शक्तीची प्रेरणा दिली आहे. त्याच प्रेरणेतुन आज देशावर कोरोनाचे संकट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद देत असंख्य दिव्यांनी राजगुरुनगर दिपोमय झाले होते. काही क्षणांसाठी हिच ती क्रांतीची मशाल पेटली, अशी भावना क्रांतीकारकाच्या भूमीत पहायला मिळाली.
साऱ्या जगावर कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. त्याच कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या देशातील प्रत्येक नागरिक आपल्या परीने प्रयत्न करत आहे त्याच प्रयत्नांना साथ, प्रतिसाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (रविवार) रात्री ९ वा ९ मिनीटांनी लाईट बंद करुन दिवा लावण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मभुमीत दिपोत्सव व्हावा, या पद्धतीने प्रतिसाद देण्यात आला. राजगुरुनगर शहरात लहान मुलांपासुन ते वयोवृद्धांपर्यत प्रत्येकाने कोरोनावर मात करण्यासाठी दिप लावून प्रतिसाद दिला व देशावर आलेले कोरोनाचे संकट दुर होऊ दे, अशी प्रार्थना केली.