बारामती - लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ‘लाव रे तो व्हीडीओ’ असं म्हणणारे ईडीला इतके घाबरले आहेत की आता कुठय ती सीडी असे म्हणू लागले आहेत. याबाबची ईडीने अशी मेख मारली की तो आता आमचे दैवत असणाऱ्या शरद पवार यांच्यावर टिका करू लागले आहेत. ईडी यांच्याकडे यायच्या आधी पवार साहेबांचे कौतुक करताना ते थकत नव्हते, अशा शब्दात समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाव न घेता समाचार घेतला. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुंडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, आमदार यशवंत माने, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
ईडीची चव आमच्या कामगारांच्या खिशातील बिडी एवढी - राज्यात केंद्रीय तपास यंत्रणेच्या ईडी तपास यंत्रणेबाबत होत असलेल्या कारवाईबाबत भाष्य करताना मुंडे म्हणाले की, ईडीची चव आमच्या ऊसतोड कामगारांच्या खिशातील बिडी एवढीच उरली आहे. मुंडे म्हणाले की, साहेबांच्या नादी लागू नका असे मी म्हणत होतो. पण त्यांनी ऐकले नाही. त्याचा परिणाम असा झाला की 56 आमदारांचा मुख्यमंत्री 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री 44 आमदारांचे मंत्री तर 105 आमदार असलेल्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता असा झाला आहे.
मलाही साहेब, दादा आणि ताईंच्या मनातलं समजायला लागलंय - विधानसभा निवडणुक लागली होती. हल्लाबोल सभा इंदापूरला झाली होती. त्या सभेत बोलताना मी दत्तात्रय भरणेंना भावी आमदार संबोधलं. त्यावर दादांनी इकडच्या राजकारणाची अंडीपिल्ली कळायला वेळ लागेल म्हणाले होते. त्यानंतर मामांनाच विधानसभेचे तिकिट मिळालं. याबाबत बोलताना आज मुंडे म्हणाले की, आता मलाही साहेब, दादा आणि ताईंच्या मनातलं समजायला लागलंय.