पुणे - नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनाने वर्षाची सुरुवात करण्याकडे नागरिकांचा कल असतो. राज्यात ठिकठिकाणी असलेल्या प्रसिद्ध मंदिरामध्ये नागरिक वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी गर्दी करत असतात. पुण्यातही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटेच पुणेकरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन करण्यासाठी गर्दी केली होती.
प्रत्येक वर्षाची सुरुवात अनेक जण श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन करत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियम पाळत भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेतले. सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मात्र, मास्कशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. दरवर्षीपेक्षा यंदा भाविकांची गर्दी कमी होती तरीही दिवसभरात हजारो भाविक गणपती बाप्पांचं दर्शन घेतात. कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकही सर्व नियमांचे पालन करताना दिसले. शासकीय नियमानुसार मंदिर ट्रस्टने सर्व तयारी केली होती. कोणालाही हार नारळ मंदिरात नेण्यास परवानगी देण्यात आली नाही.
दरम्यान, आज अकरा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिकाना दर्शन घेता येणार आहे. यावेळी दर्शनाला आलेल्या भाविकांकडून कोरोनाचे संकट दूर व्हावे असे साकडे गणपती बाप्पांना घालण्यात आले.