नागपूर Devendra Godbole Arrested : नागपूर ग्रामीणचे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांच्यासह नऊ जणांना मौदा पोलिसांनी अटक केली आहे. मागील दोन दिवसांपासून देवेंद्र गोडबोले त्यांच्या कार्यकर्त्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आंदोलन करत होते. त्या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राहुल नार्वेकरांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. तसंच मुंडन आंदोलनही केलं. दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शुक्रवारी (12 जानेवारी) रात्री देवेंद्र गोडबोले यांच्यासह नऊ जणांना मौदा पोलिसांनी अटक केली आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्यानं अटक : गेल्या दोन दिवसांपासून देवेंद्र गोडबोले त्यांच्या कार्यकर्त्यांसह राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आंदोलन करत होते. मौदा पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, गोडबोले यांनी पोलिसांशी जोरदार हुज्जत घातली. तसंच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची अडवणूक करत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळं मौदा पोलिसांनी भांदवि कलम 353 अंतर्गत गोडबोलेंसह त्यांच्या नऊ सहकाऱ्यांना अटक केली आहे.
अध्यक्षांच्या निर्णयावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिलाय. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की,"सभापती हे घटनात्मकपद असून त्यांना न्यायिक अधिकार आहेत. शिवसेना प्रकरणात अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलंय. सभापतींनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही."
काय आहे प्रकरण : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात दोन गट पडले होते. अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री बनले. त्यानंतर व्हीप डावलल्यानं शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून न्यायालयात धाव घेण्यात आली. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणात निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. बुधवारी (10 जानेवारी) या प्रकरणाचा निकाल लागला. यावेळी नार्वेकरांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असून, दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल दिला. या निर्णयामुळं एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, दुसरीकडं ठाकरे गटामध्ये नाराजीचा सूर दिसून येत असून याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आंदोलन करत आहेत.
हेही वाचा -