पुणे (राजगुरुनगर) - भारत सरकारच्या कांदा लसूण संशोधन संचलनालय आणि कला बायोटेक यांच्या संयुक्त प्रयत्नाने साठवणुकीवर ’कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर ' हे अतिशय प्रभावी संशोधन तीन वर्षाच्या मेहनतीतून विकसित केले आहे. नैसर्गिक कांदा चाळ, कोल्ड स्टोरेज यांच्यातील विविध प्रयोग. त्यातील निरीक्षणे लक्षात घेऊन "कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर ' कांदा उत्पादक ते ग्राहक या साखळीतील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त ठरणार आहे.
कांद्यावर संशोधन करणारे राजगुरुनगर येथील कांदा-लसूण संशोधन संचालनालय व चाकण येथील कला बायोटेक यांच्या संयुक्त प्रयत्नातून कमी खर्चात कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. नैसर्गिक कांद्याचे चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणुकी पश्चात होणारे नुकसान जास्त होते. म्हणून कांद्याचे नुकसान कमी करण्यासाठी कांदा लसून संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ मेजर सिंग, संशोधक डॉ कल्याणी गोरेपाटी, डॉ राजीव काळे यांनी कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर' ची संकल्पना तयार केली आहे.
दोनशे टन क्षमतेचे स्टोरेज स्ट्रक्चर -
यासाठी चाकण येथील कला बायोटेक प्रा.ली या कंपनीच्या मदतीने दोनशे टन क्षमतेचे स्टोरेज स्ट्रक्चर तयार करण्यात आले. या स्टोरेजमध्ये नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याची साठवणूक केली. कांद्याची नुकसान (सड) 15 टक्क्यांवर आली आहे. जे नैसर्गिक कांदा चाळीमध्ये 40 ते 60 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पुढील काळात कांद्याच्या साठवणीसाठी तयार झालेले कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर' फायदेशीर ठरणार असल्याचे कांदा लसुण केंद्राचे संचालक डॉ मेजर सिंग यांनी सांगितले.
कांदा साठवणुकीचे नवीन तंत्रज्ञान-
काही वर्षापासून वातावरणातील मोठा बदल, अवकाळी पाऊस, गारपीट, कांदा पिकांवर होणारा अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर, अशा कारणांमुळे पिकवलेला कांदा जास्त काळ टिकत नाही. त्याची साठवण क्षमता कमी झालेली असते. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च आणि बाजारमूल्य यांची योग्य सांगड बसू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रावर साठवणीबाबत उपाययोजनांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानुसार दीर्घकाळ कांद्याची साठवणूक करण्यासाठी कमी खर्चात कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र सध्या सर्रास दिसून येते. हे नुकसान टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानातून विकसित केलेली "कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर'ची पद्धत शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे, असे कांदा-लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे यांनी सांगितले.
'हे' संशोधन ठरणार वरदान-
कांद्याचे उत्पादन घेत असताना मोठा भांडवली खर्च शेतकऱ्यांना उभा करावा लागतो. यासाठी कांद्याचे उत्पन्न वाढवून चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशिल असतात. मात्र बाजारभावाच्या चढ उतारामुळे कांद्याची साठवणूक गरजेची असते. यासाठी कांदा लसुण संशोधन संचालनालय व कला बायोटेक प्रा.ली या दोघांच्या संयुक्त विद्यमाने 'कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर' तयार करण्यात आले. या तंत्रज्ञानातून कांद्याची साठवणुक केल्यास कांद्याचे नुकसान कमी प्रमाणात होते. व कांदा साठवणुकीतून बाहेर काढल्यानंतरही दिर्घकाळ टिकतो. हे तंत्रज्ञान साठवण गृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रित करून हवा खेळती राहण्यासाठी तयार केले आहे. यासाठी प्रतिकिलो प्रतिमहिना 60 पैसे खर्च येतो. हा खर्च लक्षात घेता, 'कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर' हे तंत्रज्ञान फायदेशिर आहे, अशी माहिती कांदा लसुन केंद्राचे संशोधक कल्याणी गोरेपाटी यांनी सांगितले.
कांद्याची स्थिती मोबाईलद्वारे समजणार-
हे तंत्रज्ञान कमी खर्चात विकसित केले आहे. बाहेरील वातावरण आणि स्टोरेजमधील वातावरण यांच्यातील समतोल राखण्यात आला आहे. त्यानंतर साठवणुकीतील कांद्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पोषक वातावरण तयार करण्यात आले आहे. यामध्ये स्टोरेजमधील कांद्याची स्थिती मोबाईलद्वारे समजणार आहे. यासाठी कमी खर्चातून कांद्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. हे कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर सरकारी अनुदान देऊन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले. तर शेतकरी सहजतेने समस्येवर मात करेल. असा विश्वास कला बायोटेकचे संचालक मनोज फुटाणे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- 'संरक्षण उत्पादनात भारत लवकरच होणार आत्मनिर्भर'
हेही वाचा- बिहार विधानसभा : तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार