पुणे- पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरातील मोबाईल शॉपीचे दुकान फोडणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा चारच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रमजान अली उर्फ गुड्डू जलेबी इशा मोहमद अन्सारी वय 27 रा. भिवंडी आणि पाकी मन्सुर शेख वय- 35, रा. हिंजवडी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रमजान अली उर्फ गुड जलेबी इशा मोहमद अन्सारी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात घरफोडीचे 3 व जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखा चारच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा-निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या 6 आरोपींना जामीन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात असलेल्या राज मोबाईल शॉपीचे दुकान फोडणाऱ्या आरोपींचा शोध गुन्हे शाखा युनिट चारचे अधिकारी आणि कर्मचारी घेत होते. तपासादरम्यान चोरी झालेल्या परिसरातील 100 सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. एका फुटेजमध्ये 5 ते 6 जण चोरी करत असल्याचे समोर आले. त्याच आधारे धागेदोरे शोधत पोलिसांना दोघांची माहिती काढली. सखोल तपस केला असता सराईत गुन्हेगार गुड्डू जलेबी याने त्याच्या साथीदारासह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आरोपी त्याच्या साधीदारासह वारजे परिसरात असून तो भिवंडीला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रमजान अली उर्फ गुड्डू जलेबी इशा मोहमद अन्सारीच्या चारचाकी मोटारीत चोरी केलेले 23 मोबाईल आणि चारचाकी मोटार असा एकूण 5 लाख 11 हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट चार पथकाने हस्तगत केला आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, वासुदेव मुंढे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, आजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आधारी, गौस नदाफ, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.