पुणे : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडं सुषमा अंधारे यांना कल्याण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मात्र, सुषमा अंधारेंनी आपण कल्याण विधानसभा लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'मी' कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करते. पण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी 'मी' सध्या कोणत्याही मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं नाही. 'मी' उद्धव ठाकरे यांच्या टीममध्ये काम करणार असून महाराष्ट्रात फिरून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं अंधारे यांनी म्हटलंय.
अमित शाह निवडणुकीच्या वेळी मातोश्रीवर कसे : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. 1999 ची शिवसेनेची घटना मान्य करून एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे नेते आहेत, असं त्यांनी म्हटलंय. मग अमित शाह निवडणुकीच्या वेळी मातोश्रीवर कसे आले, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
राहुल नार्वेकर गिरे तो भी नाक उपर : शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाकडं पाठवल्याचे कागदपत्र दाखवूनही नार्वेकर आपला खोटारडेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल नार्वेकर यांनी 1999 ची घटना मान्य केलीय. राहुल नार्वेकर गिरे तो भी नाक उपर असं, ते समजत आहेत. ते खोट्याचं खरं करत आहेत. शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, रामदास कदम हे नेते क्रमांक एकवर होते. आता ते क्रमांक पाचवर गेले, याचं वाईट वाटतं, असं अंधारे यांनी म्हटलंय.
उदयनराजेंच्या वक्तव्यावर खेद : उदयनराजे यांनी भाजपावर बोलताना आम्हाला टीममध्ये घ्या नाहीतर विसरून जाल असं म्हटलं होतं. त्यावर अंधारे म्हणाल्या, आम्हाला टीम मध्ये घ्या असं उदयनराजेंना म्हणावं लागतं. हे वाईट आहे. शिवसेनेत लवकरच मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज कलावंत प्रवेश करणार आहे, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. व्यंगचित्राचे बाळकडू नावाचं चित्र प्रदर्शन बालगंधर्व रंग मंदिरामध्ये भरवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर सुषमा अंधारे माध्यमांशी बोलत होत्या.
बालगंधर्व पाडण्यास विरोध : बालगंधर्व रंगमंदिर पाडून नव्यानं बांधण्यात येणार असल्याचं राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी एका कार्यक्रमात सांगितलं. मात्र, कलाकार, कामगारांच्या उदरनिर्वाहाचा विचार न करता बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याची भाषा मुख्य सचिवांना शोभत नाही. कंत्राटदाराच्या कामाचं कमिशन सर्व ठरलं आहे, मात्र तीन वर्ष कलाकारांनी काय करावं याचा विचार झालेला नाही. आम्ही बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या विरोधात असून योग्य वेळी रस्त्यावर उतरू, असा इशारा अंधारे यांनी राज्य सरकारला दिलाय.
हेही वाचा -
- महायुती सरकारचा अँम्ब्युलन्स घोटाळा, 8 हजार कोटी कंत्राटदाराच्या घशात - वडेट्टीवार
- 'मंदिरात तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणे, बाहेर आल्यावर प्रतिक्रिया देणं आपल्याला जमत नाही'; जितेंद्र आव्हाडांचा पत्रकारांपुढे टोला
- मुख्यमंत्र्यांनी दावोसला दलाल नेले; मुख्यमंत्री शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका