पुणे - सध्याची परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील उद्योग सुरू करायला परवानगी दिली आहे. मात्र, कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला त्यांनी भेट देत वॉर रूमच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे, तर संपूर्ण राज्य कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामूहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी करोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले. या लढ्यात सर्वांचा पाठिंबा आणि साथ आजपर्यंत मिळाली आहे, यापुढेही कायम ठेवल्यास करोनावर निश्चितच विजय मिळवू, असेही पवार म्हणाले. तसेच कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो, असेही ते म्हणाले.
अजित पवारांनी शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पालिकेचेआयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पालिका व वायसीएम अधिकारी यावेळी उपस्थित होते.
इंडस्ट्रीच्या अडचणी सोडविणार -
पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमध्ये पुण्यातील अनेकजण कामाला आहेत. मात्र, पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का? याबाबत प्रयत्न करणार असून इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचालक व कामगारांचे समोर येत आहेत. त्यावरही तात्काळ मार्ग काढला जाईल, असे अजित पवार म्हणाले.
हॉटेल प्रश्नाबाबत मुंबईत बैठक -
पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आल्याचा मुद्दा माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिला. यावर मुंबईत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे. याबाबत हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठकीसाठी बोलविण्यात आले असून यावेळी हॉटेल संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.