बारामती(पुणे) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या बारामती पॅटर्नचा अत्यंत चांगला परिणाम दिसून येत आहे. या पॅटर्नकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असल्याने हा पॅटर्न अधिकाधिक सर्तकतेने राबविण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रमुख अधिकारी व पदाधिकऱ्यांची बैठक घेत कोरोना संबंधीचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी मागील आठवड्यात झालेल्या कोरोना संबंधीच्या बैठकीतील मुद्द्यांचे पुढे काय झाले याबाबत माहिती जाणून घेतली.
बारामतीमधील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची वेळोवेळी तपासणी करा. आवश्यकता वाटल्यास त्या रुग्णांच्या पुन्हा चाचण्या घ्या. टाळेबंदी अधिक कडक करुन बारामती पॅटर्न अधिक प्रभावीपणे राबवा.तसेच पुण्यात तयार करण्यात आलेल्या अॅपच्या धर्तीवर येथील कोरोना समितीने मेडिकल अॅप तयार करावे, अशा सूचना पवार यांनी केल्या.
शरद भोजन थाळी संर्दभात योग्य ते सर्वेक्षण करुन जास्तीत जास्त नागरिकांना त्यांचा लाभ देण्यात यावा. तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे ११२५ कोटी रुपये राज्य सरकारने दिले असून त्याचे लाभार्थ्यांना लवकरात लवकर वितरण करुन त्यांना दिलासा दया.असा आदेश पवार यांनी महसूल विभागाला दिला.
रेशनिंगवर मिळणाऱ्या धान्य वाटपाबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता येऊ नये याकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष दयावे, असेही अजित पवार यांनी सांगितले.यावेळी प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठता संजयकुमार तांबे, डॉ.सदानंद काळे, डॉ.मनोज खोमणे उपस्थित होते.