बारामती - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना जास्त धोका आहे. हा धोका लक्षात घेऊन बारामती तालुक्यात कोरोनाची साखळी मोडण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा पवार यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना अजित पवारांनी संबंधित विभागाला दिल्या. तसेच तालुक्यातील आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करावी. शासकीय व खासगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबतही सूचना केल्या आहेत.
मर्यादित स्वरुपात लस
'म्युकरमायकोसिस' रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा व लहान मुलांवर करावे लागणाऱ्या उपचाराच्या साधनसामुग्रीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन पवार यांनी दिले. तसेच कोरोनाबाधित झालेल्या लहान मुलांच्या पालकांची देखील राहण्याची सोय करणे गरजेचे असल्याचेही अजित पवार म्हणाले. कोरोना प्रतिबंधाच्यादृष्टीने 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. परंतु सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात यावे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही पवार म्हणाले.
विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीपूर्वी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिजमार्फत महिला हॉस्पिटल बारामती रूग्णालयाला 2 टन क्षमतेचे 3 एअस कंडिशन्स व मेडिकल कॉलेज कोविड सेंटरला फेस शिल्ड, सर्जिकल हेड कॅप, सर्जिकल शू कव्हर, सर्जिकल मास्क, हॅण्ड ग्लोज, डिसपोजल आर्पन, हॅण्ड वॉश, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, वॉटर कूलर, ऑक्सिजन ट्रॉली इत्यादी साहित्य देण्यात आले. तसेच वेंचर स्टीलचे रमाकांत पाडोळे यांच्याकडून 25 हजार रूपयांचा धानादेश देखील उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूपूर्द करण्यात आला.