पुणे - धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. आता विरोधक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. खूप जणांनी खूप काही लपवले आहे. त्यामुळे जास्त खोलात जाऊ देऊ नका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विकास कामांसाठी वेगळ्या राजकीय पक्षाचे नेते भेटतात
विरोधी पक्षातील अनेक नेते मंडळी आपल्याला भेटत आहेत. त्यावरून अनेक राजकीय चर्चा होत आहे. काल शिवेंद्रसिंहराजे भेटले आज परिचारक भेटले हे जरी वेगळ्या राजकीय पक्षात असले तरी मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. मला इतर पक्षातील नेते मंडळी विकास कामांसाठी भेटत असतात उगीच राजकीय अर्थ काढू नका. जर कोणी पक्ष प्रवेश करणार असेल तर मी सांगेनच, असे अजित पवार म्हणाले.
पुणेकरांना हक्काचं पाणी मिळणार
पुण्यात एका माणसाला दिडशे लिटर पाणी मिळाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पाण्याचा कोटा ठरवला जाईल. पुण्याच्या लोकसंख्येचा विचार करूनच पाण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असल्याचे अजित पवार म्हणाले.
सीरमबाबत घाई करण्यात अर्थ नाही
सीरमच्या आगीबाबत ऑडिट झाल्याशिवाय चित्र स्पष्ट होणार नाही. आपण घाई करण्यात काहीही अर्थ नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.