पुणे - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद करण्यात आलेली मंदिर उघडण्यात यावी, या मागणीसाठी भाजपकडून संपूर्ण राज्यात घंटानाद आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे विश्व वारकरी सेनेने राज्यातील मंदिरांमध्ये भजन-कीर्तन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अन्यथा 31 ऑगस्टला पंढरपूरमध्ये एक लाख वारकरी ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हेही आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातून पंढरपूरला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात 21 ऑगस्टपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना आंतरजिल्हा वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तेव्हापासून पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या मार्गावर बससेवा सुरू आहे. परंतु उद्या (ता. 31 सोमवार ) पंढरपूरमध्ये होणाऱ्या विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून पंढरपूरला जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय स्वारगेट आगार प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. कोणत्याही आंदोलनात परिवहन महामंडळाच्या बसेसना टार्गेट केले जाते. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या आंदोलनातही ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शक्यता गृहीत धरून पुण्याहून पंढरपूरला जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विश्व वारकरी सेनेने पत्रकार परिषद घेत राज्यात आता अनलॉक सुरू असताना मंदिरे का बंद आहेत? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच राज्यातील प्रत्येक मंदिरात किमान 50 भाविकांना भजन आणि कीर्तनाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. अन्यथा 31 ऑगस्ट रोजी राज्यातील एक लाख भाविक पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करतील, असा इशाराही दिला होता. विशेष म्हणजे या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हेही सहभागी होणार आहेत.
हेही वाचा - सत्तेचे दार बंद झाल्यानेच भाजपचे घंटानाद आंदोलन - रुपाली चाकणकर