पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉक डाऊन आहे. या परिस्थितीत नागरिकांना भाजी-पाला, फळे उपलब्ध व्हावे, यासाठी पुण्यात मार्केट यार्ड सुरू आहे. शुक्रवारी पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने त्याचा परिणाम हापूस आंब्याच्या विक्रीवर होत आहे. 6 ते 7 गाड्या हापुसची आवक झाली असून मात्र उठाव नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत.
अक्षय तृतीयेपासून आंबे खाण्याची प्रथा अनेक जण पाळतात. त्यामुळे एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक ही मार्केट यार्डमध्ये होत असते. यंदा मात्र, कोरोनाचे सावट असल्याने त्याचा परिणाम हापूस आंब्याच्या आवकवर ही झाला आहे. यंदा मार्केट यार्डात शुक्रवारी साधारण 2 ते अडीच हजार रत्नागिरी हापूस आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. मात्र, या मालाला उठाव दिसून येत नाही. काही किरकोळ गिऱ्हाईक सोडले तर ठोक खरेदीदार आले नसल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सांगत आहेत. एकूणच, कोरोनाचा प्रभाव हा हापूस आंब्याच्या आवक आणि विक्रीवर दिसून येत असल्याने आगामी काळात आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.