पुणे - खेड पंचायत समिती सदस्याच्या पतीकडे 6 जणांनी मिळून 25 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खंडणी न दिल्यास सदस्याच्या पतीला ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. गणेश शांताराम जाधव ( वय 35, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) असे पंचायत समिती सदस्य यांच्या पतीचे नाव आहे
रामनाथ सोनवणे (रा. कुरूळी ता. खेड), बाळू आप्पा वाघिरे (रा. पिंपरी) आणि त्यांच्या 3 ते 4 साथीदारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ सोनवणे, बाळू वाघिरे आणि त्यांच्या साथीदारांनी गणेश यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी वारंवार गणेश यांना फोन करून धमकी दिली. तसेच रस्त्याने जात असताना गाडी आडवी लावून त्रास दिला. त्यानंतर गणेश यांचे मेहुणे संदीप पवार यांच्या ताथवडे येथील हॉटेलवर जाऊन आरोपींनी संदीप पवार यांना 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे याबाबत पोलीस ठाण्यता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करत आहे.