पुणे - महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 43 वर पोहोचला आहे. सांगलीत दोन तर कोल्हापुरात आणखी एक मृतदेह सापडला आहे. मृतांमध्ये सांगलीतील 21, कोल्हापूरातील 7, साताऱ्याताील 7, पुण्यातील 7 तर, सोलापुरातील एका नागरिकाचा समावेश आहे. पूर ओसरायला सुरुवात झाली असून, 73 सरकारी अधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या 6 दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगलोर महामार्ग सुरू झाल्याने मदत साहित्याच्या ट्रकसह गॅस, पेट्रोल, डिझेल आदी साहित्य कोल्हापूरात पाठवण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत मदतसाहित्याचे सांगलीत 30 तर कोल्हापुरात 17 ट्रक पाठविण्यात आले आहेत. यामध्ये पाणी,बिस्कीट,फरसाण,दूध पावडर,ब्लँकेट,साड्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
म्हैसेकर म्हणाले, आतापर्यंत सांगली आणि कोल्हापुरातील 4,74,226 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. एकूण 596 निवारा केंद्रांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकांना मनुष्यबळ पुरवण्यासाठी निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावे त्वरित स्वच्छ करण्यात येतील. पूरग्रस्त भागात सध्या 313 एटीएम सूरु असून त्यात 25 कोटींची रक्कम भरण्यात आली आहे. उद्यापासून पूरग्रस्तांना मदत वाटप करण्यात येईल.