पुणे - शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथे एका 55 वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने महिलेचा मृतदेह विहिरीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शारदा सकट असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
शारदा सकट या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी शिक्रापूर पोलिसांत दिली होती. नातेवाईक आणि पोलिसांकडून शोध सुरु असतानाच आज दुपारच्या सुमारास शारदा सकट यांचा मृतदेह हिवरे कुंभार येथील एका शेताच्या बाजूला असलेल्या विहिरीत आढळला. मृतदेह शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.