पुणे- दौंड तालुक्यातील मलठण येथील भीमा नदी पात्रात दोन वाळू तस्करांच्या गटात झालेल्या वादातून एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. निखील संतोष होलम (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. एनडीआरएफच्या जवानांनी मोठी पराकाष्ठा करुन तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे.
हेही वाचा- पुणे-माणगाव मार्गावर ताम्हणी घाटात अपघात; तिघांचा मृत्यू
मलठण येथील भीमा नदी पात्रात वाळू तस्करांच्या दोन गटात मध्यरात्रीच्या सुमारास शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्या गटात नदीपात्रातच हाणामारी झाली. यामध्ये शिरापूर येथील तरुण नदी पात्रात बुडाल्याचा संशय व्यक्त केला होता.
गेल्या तीन दिवसांपासून मावळ येथील आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थनिक मासेमारी करणारे नागरिक, पोलीस व महसूल यंत्रणा तरुणाचा शोध घेत होती. मात्र, यात अपयश आल्याने दौंडचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक यांनी आज (गुरुवारी) एनडीआरएफचे पथक पाचारण केले. आज दुपारच्या सुमारास तरुणाचा मृतदेह सापडला.
नदी पात्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत तरीही प्रशासन यांची गंभीर दखल घेत नाही. अशा घटना का घडत आहेत यांची सखोल माहिती घेऊन कार्यवाही केली तर पुढील काळात नदी पात्रात अशा घटना घडणार नाहीत, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.