पुणे - गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Jayant Patil Meeting) पुणे दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा रविवारी सकाळपासून सुरू होती. यावर आता जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या सर्व बातम्या खोट्या असून, मी शरद पवारांसोबतच आहे, असे ते म्हणाले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोकांना अफवा उठवायला खूप आवडतात. जयंत पाटील यांची कुठलीही भेट अमित शाह यांच्याशी झालेली नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
अमित शाह-जयंत पाटील भेट अफवा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील संपदा सहकारी बँकेच्या मुख्यालयाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी अमित शाह आणि जयंत पाटील यांच्या भेटीच्या बातमीवर स्पष्टीकरण दिले आहे. जयंत पाटील हे अमित शाह यांना भेटले नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसेच जो कोणी पतंगबाजी करत आहे, त्यांनी सविस्तर माहिती घेवून त्यानंतरच अशा बातम्या चालवाव्यात, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. कुठलीही बातमी सांगताना त्याचा स्तर निश्चित करा आणि आपला स्तर ढासळून देऊ नका, अशा भाषेत फडणवीस यांनी अशा अफवा उठवणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला आहे.
जयंत पाटलांचा खुलासा - 'अमित शाहांसोबत माझी कुठलीही भेट झाली नाही. मी अजित पवारांसोबत जाण्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. एखाद्याबद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू झाला आहे. असे करणे बरोबर नाही, अशा शब्दात त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी शरद पवारांची साथ सोडणार या बातम्यांमुळे माझी सकाळपासून करमणूक होत आहे. मात्र आता हे सर्व थांबवा, अशी विनंती त्यांनी प्रसारमाध्यमांना केली.
हेही वाचा -