दौंड (पुणे) -दौंड शहरातील सहकार चौक येथे कंपनीची बस अडवून कामगारांना दमदाटी व शिवीगाळ करून कंपनी व्यवस्थापकाला बस चालावण्यासाठी खंडणी मागणाऱ्या आरोपीस दौंड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
एप्रिल महिन्यात केला होता गुन्हा
27 एप्रिलला रात्रीच्या सुमारास दौंडच्या हद्दीत दौंड-कुरकुंभ रस्त्यावर सिप्ला कंपनीची बस कामगार व आधिकारी घेवून जात होती. सहकार चौक येथे मोटारसायकलीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी बस अडवून बसमधील कंपनीच्या कामगारांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकाला फोन करुन तुमची बस कंपनीला चालवायची असेल तर मला दरमहा पाच हजार रुपये द्या, नाहीतर तुमच्या काड्या चालू देणार नाही, अशी धमकी दिली. एवढ्यावर न थांबता प्रवाशांना खाली उतरवून बस बॅरिकेट्सला धडकवून बसचे नुकसान केले व घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अभिषेक गोविंद सातपूते (रा. शालीमार चौक, ता. दौंड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी सापळा रचून पकडले आरोपीस
या गुन्ह्यातील आरोपी अभिषेक हा महालक्ष्मी रुग्णालय येथे येणार असल्याची पोलीस अंमलदार अमिर शेख यांना मिळाली होती. यानंतर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अभिषेकच्या मुसक्या आवळल्या.
आरोपीची गुन्ह्याची कबुली
आरोपी अभिषेक गोविंद सातपूते हा महालक्ष्मी रुग्णालयापासून घरी जाण्याच्या मार्गवर असताना त्याला शालीमार चौक येथे पकडून पोलीस पथकाने ताब्यात घेतले. अभिषेककडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
हेही वाचा - शिक्रापूर पोलिसांचा जुगार अड्यावर छापा, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल