पुणे - गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक मंडळांनी मंदिरामध्येच व ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय यावर्षी घेतला. त्याला गणेशभक्तांचीही उत्तम साथ मिळत असून ऑनलाईन दर्शन घेणा-यांची संख्या मोठी आहे. विसर्जन व सांगता सोहळ्याला देखील गर्दी होऊ नये, याकरिता दगडूशेठ गणपती ट्रस्टने श्रींचे विसर्जन मुख्य मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत चतूर्थीला सूर्यास्ताच्या वेळी मुख्य मंदिरात दगडूशेठच्या श्रींचे विसर्जन होणार आहे.
या विषयी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या या निर्णयाचे अनुकरण केवळ पुण्यातीलच नाही, तर महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी करावे. गणेश मंडळांनी आपापल्या मंदिराच्या किंवा उत्सव मंडपाच्या परिसरात विसर्जनाची सोय करावी. तसेच समस्त पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. यामुळे कोरोनाशी सुरू असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत होणार आहे. श्रींच्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागेल.
उत्सव काळात देखील दगडूशेठ गणपती मंदिर बंद राहणार असल्याने, मंडळाचे कार्यकर्ते देखील मंदिरात दर्शनासाठी जाणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी देखील मंदिराजवळ गर्दी करु नये. भाविकांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही गोडसे यांनी केले आहे.
हेही वाचा - ईटीव्ही स्पेशल : लॉकडाऊनमध्ये क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीचे भांडण; अनेकांचे संसार विस्कटले!
हेही वाचा - जुन्नर तालुक्यात जमिनीला पडल्या भेगा, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण