पुणे- देशात कोरोना विषाणूने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूमुळे लोकांच्या मनात धास्ती भरली असून बाहेर जाण्यास टाळले जात आहे. मात्र, या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार सज्ज झाले आहेत. कोरोनाबाबत माहिती देणाऱ्या खोट्या लिंक्स तयार करून लोकांची आर्थिक माहिती चोरण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगारांकडून होत आहे.
जगात कुठेकुठे कोरोना विषाणूने थैमान घातले, त्याचबरोबर मृतकांची संख्या इत्यादी गोष्टी जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. या उत्सुकतेपोटी लोक इंटरनेटवर विविध वेबसाईट्स चाळत आहेत. मात्र, या गोष्टीचा गैर फायदा घेण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगारांकडून होत आहे. 'coronavirusmap.com' या आणि अशा बऱ्याच लिंक्सद्वारे सायबर गुन्हेगार नागरिकांची बँक खाती रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहे. सदर लिंकवर क्लिक केल्यास त्यातून 'win32.exe' हा मालवेअर तुमच्या कॉम्युटर आणि मोबाईलमध्ये डाऊनलोड होतो आणि महत्वाची माहिती चोरीला जाते.
याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर विभाग सज्ज झाला आहे. विभागाकडून असे गुन्हे रोखण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आला आहे. या पथकामार्फत अशा गुन्ह्यांवर नजर ठेवली जात असून कोरोनाबाबात लोकांमध्ये चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा लिंक्सपासून सावधान राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
हेही वाचा- BS-4 वाहन घेताना ही घ्या काळजी; 31 मार्चनंतर नोंदणी होणार बंद