पुणे Cyber Crime Pune : गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचं स्वरूप हे बदललं असून आता मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये ऑनलाईन फसवणूक, सेक्सटॉर्शन अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत होती. पण आता सायबरच्या या गुन्ह्यांबरोबर 'ऑनलाईन टास्क' तसंच 'फेडएक्स कुरिअर' या गुन्ह्यात वाढ झाली आहे. पुणे सायबर पोलीस ठाणे येथे आतापर्यंत जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट या आठ महिन्यात 1114 विविध गुन्ह्यांचे अर्ज हे आले आहेत. यात फक्त ऑनलाईन टास्क या गुन्ह्यात 20 कोटी पेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे.
गुन्ह्यांचे स्वरूप व आकडेवारी : पुणे शहरात मागील आठ महिन्यांच्या कालावधीत एकूणच विविध सायबर गुन्ह्यांची माहिती घेतली तर त्यात मनी ट्रान्स्फरची 56 प्रकरणे, केव्हीएसी अपडेट गुन्ह्यांचे 42, क्रिप्टोकरन्सीचे 58, विमाबाबत फसवणुकीचे 10, जॉब फसवणुकीचे 31, शेअर मार्केट फ्रॉड 27, लोन फ्रॉड 29, ऑनलाईन सेल आणि पर्चेस फ्रॉडचे 62, फेक प्रोफाईल 85, फेसबुक हॅकिंग 34, सेक्सटॉर्षणचे 35 यासह इतर असे एकूण 1114 अर्ज या आठ महिन्यात आले आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे टास्क फ्रॉडचे आतापर्यंत 209 अर्ज आले असून यात 20 कोटीचे आर्थिक नुकसान झालं आहे. याप्रकरणी आतापर्यंत 20 गुन्हे दाखल झाले आहेत.
कशी होते फसवणूक : सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यात जर पाहिलं तर 'टास्क फ्रॉड'मध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. ज्यात हाय हॅलो म्हटलं जातं आणि याला तुम्ही उत्तर दिल्यास तुम्हाला मी ऑलिव्ह बोलत आहे. मी जास्त नाही काही मिनिटच तुमची वेळ घेईल, असं सांगितलं जातं आणि तुम्हाला अर्न आणि लर्न आणि घर बसल्या कामाबाबत सांगितलं जातं. यानंतर तुम्हाला एक टास्क सांगितला जातो. ज्यात सुरुवातीच्या 3 टास्क फ्री दिल्या जातात आणि मग तुम्हाला काही टास्क सांगितले जातात. ज्यातून तुम्हाला 2 हजार ते 10 हजार रुपये मिळतील असं सांगितलं जातं. तुम्ही ते टास्क पूर्ण केले की हळूहळू ते तुम्हाला पैसे वाढवून देतात आणि मग एक मोठ्या रकमेचा टास्क देतात. यामध्ये तुमचे जेवढे पैसे आहे ते काढून घेतात. मोठी रक्कम जरी गेली तरी त्यापेक्षा दुप्पटीचे एक टास्क दिला जातो आणि मग तुम्ही अजून मोठी रक्कम लावता आणि ते पैसे काढून घेतात. बघता-बघता खात्यामधून मोठी रक्कम काढून घेतात आणि अशा पद्धतीने फसवणूक केली जात आहे.
2 कोटीहून अधिक रक्कम लंपास : पुण्यात मागील काही दिवसांपूर्वी जसं सेक्सटॉर्शनच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात सायबर पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. तशा फसवणुकीच्या घटना सध्या पुणे शहरात घडत आहेत. यात तर एका प्रकरणात एका व्यक्तीकडून तब्बल 2 कोटीहून अधिक रक्कम सायबर चोरट्यांनी घेतली आहे.
तर घाबरु नका : 'फेडएक्स कुरिअर' या गुन्ह्यात तर संबंधित व्यक्तीला विदेशातून कुरिअर आला आहे आणि त्या कुरिअरमध्ये ड्रग्स सापडले आहेत. मुंबई तसंच इतर शहरातील पोलीस अधिकारी आपल्याशी बोलत आहेत, असं सांगितलं जातं. मग ते अधिकारी असल्याचा बनाव करून स्काईपवर बोललं जातं आणि मग जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर पैसे द्यावे लागतील असं सांगून लाखो रुपयांची फसवणूकही केली जात आहे, असा फोन आल्यास घाबरून जाऊ नका, असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.
तर पोलिसांना माहिती द्या : सायबर पोलीस अधीक्षक मीनल पाटील म्हणाल्या की, सध्या या दोन गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यात सर्वच वयोगटातील लोक आहेत. मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अशा पद्धतीचा जर आपल्याला मेसेज आला किंवा तुमचा पार्सल आला आहे, असं सांगितल गेलं तर आपण याकडे दुर्लक्ष करावं, असं काही घडत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असं देखील यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा:
- Cyber Emissaries In Nashik: नाशिकमध्ये सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अनोखा उपक्रम; पोलीस आयुक्तांनी उभी केली सायबरदूतांची फौज
- Devendra Fadnavis News : सायबर गुन्हेगारी मोडून काढणार - देवेंद्र फडणवीस
- Juice Jacking Scam : स्मार्टफोन चार्जिंगला लावताच बँक खाते होईल साफ; 'अशी' घ्या तुमच्या मोबाईलची काळजी