पुणे - येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन प्रवाशांकडून सौदी अरब देशाचे सुमारे 35 लाख 41 हजार रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 16) ही कारवाई केली.
याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बालाजी मस्तापुरे आणि मयूर पाटील अशी त्यांची नावे आहेत. स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने हे दोघेही दुबईला निघाले असताना तपासणीमध्ये हे चलन त्यांच्या बॅगेत आढळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता हे चलन आपले नसून दुबई येथील एका व्यक्तीला देण्यासाठी आपल्याला देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
ही कारवाई पुणे सीमाशुल्क विभागाच्या उपायुक्त उषा भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विनिता पुसदेकर आणि संजय झरेकर या अधिकाऱ्यांनी केली आहे.