आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी व देहू शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून (दि. 28 जून) ते रविवारपर्यंत (दि. 04 जुलै) पिंपरी-चिंचवड पोलीसांच्या वतीने संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
आळंदी, देहूगाव परिसरामध्ये आषाढी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संचारबंदीचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवल्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे आळंदी व देहू गावच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र सोबत बाळगणे गरजेचे असणार आहे. या कालावधीत श्री क्षेत्र आळंदी व देहूगावामधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहणार असून गावातील धर्मशाळा, मठ, भक्तनिवास, लॉज व इतरत्र ठिकाणी भाविक व नागरिक यांना वास्तव्य करता येणार नाही.
हेही वाचा - उपमुख्यमंत्र्यांनंतर गृहमंत्र्यांनाही कोरोनाचा विसर?