पुणे : जी-२० प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
ढोल, लेझीम ताशाचे जोरदार सादरीकरण : यावेळी भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी 'सागा ऑफ मराठा एम्पायर' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या कलांचे सादरीकरण केले. प्रारंभी शिववंदना, मर्दानी खेळ, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, छक्कड, संकेतभाषा कला असलेली करपल्लवी यासोबतच तान्हाजी मालुसरे यांना समर्पित सादरीकरण करण्यात आले. शिवराज्याभिषेक गीताने कार्यक्रमात परमोच्च बिंदू गाठला. त्यानंतर अखेरीस ढोल, लेझीम ताशाचे जोरदार सादरीकरण झाले आणि परदेशी पाहुण्यांना यात सामील होण्याचा मोह अवरला नाही. त्यांनीदेखील सर्व कलाकारांना दाद देत ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरला. तर काहींनी टाळ वाजवून आनंद व्यक्त केला.
पालकमंत्र्यांनी केले प्रतिनिधींचे स्वागत : जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वागत केले. पालकमंत्र्यांनी काही प्रतिनिधींशी संवाद देखील साधला. पुणे शहराने पाहुण्यांच्या स्वागतासाठी चांगली तयारी केली आहे. पाहुण्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी व्यक्त केलेला आनंद लक्षात घेता पुणेकरांचे प्रयत्न सफल झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा सर्वांनाच आपलेसे करणारी असल्याचेही ते म्हणाले.
जी 20 अध्यक्षतेखाली पहिल्या इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग गटाची बैठक : भारताच्या जी-20 अध्यक्षतेचा एक भाग म्हणून आयोजित केलेली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप बैठक 16-17 जानेवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. 2023 इन्फ्रास्ट्रक्चर अजेंडावर चर्चा करण्यासाठी भारताने आमंत्रित केलेले मंच सदस्य, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था दोन दिवस एकत्र येतील. जी-20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप इन्फ्रा गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर चर्चा करतात. ज्यात इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप एक मालमत्ता वर्ग म्हणून विकसित करणे. दर्जेदार पायाभूत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, पायाभूत गुंतवणुकीसाठी आर्थिक संसाधने शोधने, नाविन्यपूर्ण साधनांची ओळख करणे अशा विशयांवर चर्चा होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत विधानानुसार, IWG चे परिणाम जी-20 फायनान्स ट्रॅकच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट होतात. पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देतात.