पुणे - स्वातंत्र्य दिवस आणि त्याला लागूनच आलेला रविवार, यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या वााढली आहे. त्यामुळे शनिवारी पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर कासवगतीने वाहतूक सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही महिन्यापासून द्रुतगतिमार्गावर शुकशुकाट पाहायला मिळत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक दिवसांपासून पहिल्यादाच वाहतूक संथ व कासवगतीने होत असल्याचे दिसून आले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असल्याने पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर शुकशुकाट होता. परंतु, 74 वा स्वातंत्र्य दिवस आणि सलग आलेला रविवार अशा दोन सुटीच्या दिवसांमुळे पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहने आलेली दिसत आहेत.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने अगदी कासवगतीने पुढे सरकत होती. तर द्रुतगतिमार्गावरील अमृतांजन पूल, बोरघाट या ठिकाणी नेहमीप्रमाणे वाहतूक संथ गतीने होती.
दरम्यान, मागील दोन आठवडे लोणावळा परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून धबधबे आणि झरे ओसंडून वाहत आहेत. हे दृश्य मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. द्रुतगतिमार्गाच्या दोन्ही बाजूस मनाला सुखद वाटणारे दृश्य पाहायला मिळत असल्याने अनेक जण हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहेत.