पुणे - अनलॉकमध्ये हळूहळू आयुष्य मूळपदावर येत असले तरी आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी वारंवार मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याची विनंती प्रशासनाकडून केली जात आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला जिल्हा ही नकोशी ओळख पुण्याची झाली आहे. तरीही पुणेकर मात्र बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत आहेत. अशा नागरिकांवर पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. एका महिन्यात ४ कोटींपेक्षा जास्त दंड पुणेकरांकडून वसूल केला आहे.
सध्या सुरू असलेली कारवाई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन मिळून करत आहे. नागरिक मास्क वापरत नसल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई सुरू असून त्यात ४ हजार ६८४ जणांकडून ६ लाख २८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. प्रशासनाकडून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पुणेकर मात्र, हवा तसा प्रतिसाद देत नसल्याचे यावरून दिसते.
पुणे शहरात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रशासन कोरोना अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शहरातील चौकाचौकात पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाबरोबर नागरिकांनीही लढा दिला पाहिजे, असे आवाहन सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.