पुणे - बांगलादेशी नागरिकांची शोध मोहिम मनसेला चांगलीच भोवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातून पकडून दिलेले तिन्ही नागरिक पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, हे प्रकरण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. बेकायदेशीरपणे घरात घुसून दमदाटी केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रोशन नुरहसन शेख (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेचे अजय शिंदे यांनी व त्यांच्या काही साथीदारांनी २२ फेब्रुवारीला बांगलादेशी असल्याचा संशय घेऊन फिर्यादी यांच्या घरात शिरून तुम्ही बांगलादेशी आहात, तुम्हाला भारतात राहण्याचा अधिकार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर दिलशाद अहमद हसन (वय ३५), बप्पी नेमाई सरदार (वय२७) यांना ही बांगलादेशी समजून खाली रस्त्यावर आणले. यावेळी फिर्यादी आणि त्यांच्यासोबतच्या नागरिकांनी आधार कार्ड व मतदान कार्ड दाखवून आपण भारतीय असल्याचे सांगितले. तरीही त्यांना जबरदस्तीने सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले.
तेथे त्यांनी पोलिसांना पुरावे दाखविले़ पोलिसांनी त्यांची चौकशी करुन पुरावे पाहून त्यांना सोडून दिले होते. त्यानंतर रोशन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेकायदेशीरपणे जमाव जमवून बांगलादेशी म्हणणाऱ्या व घरामध्ये बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पुराणिक करीत आहेत.