पुणे - लॉकडाऊननंतर पुण्यात गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. शहरात लॉकडाऊनमध्ये वाहन चोरी, साखळी चोरी व वाटमारीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली होती. मात्र, लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्याने आता खून, खुनाचे प्रयत्न, या गंभीर गुन्ह्यांचा आलेख वाढत चालला आहे.
शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मार्च महिन्यात राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे, लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या १ ते दीड महिन्याच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. कोरोनामुळे बहुतांश नागरिक घरीच असल्याने आपोआपच चोरट्यांच्या हालचाली कमी झाल्या होत्या. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांच्या काळात खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या अनुक्रमे दोन ते तीन घटना घडल्या होत्या. तर मारामारी, साखळी चोरी, दुचाकी चोरी यासह घरफोडी, मोबाइल चोरीची प्रकरणे देखील कमी झाली होती. गेल्या ५ महिन्यात खुनाचे ३१, तर खुनाचा प्रयत्न केल्याच्या २७ घटना घडल्या आहेत. मात्र, लॉकडाऊन सर्वांत कमी गुन्हेगारीच्या घटना मध्यवर्ती पेठांच्या भागांमध्ये घडल्या आहेत.
मात्र, दीड महिन्यानंतर 'अनलॉक १' जाहीर करून राज्य सरकारने नागरिकांसाठी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हाणामारी, खून तसेच खुनाचा प्रयत्न या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मार्च, एप्रिल या महिन्यात शहरात खुनाचे केवळ दोन आणि खुनाचा प्रयत्न करण्याचे दोन ते तीन प्रकार घडले होते. मात्र, मे महिन्यापासून या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक पुणे शहरात लॉकडाऊन असताना एवढ्या जास्त घटना घडणे हे शहराला न शोभणारे आहे. त्यामुळे, पुणे पोलिसांनी वेळीच गुन्हेगारीवर जरब बसवणे गरजेचे आहे.
शहरातील झोन नुसार खून आणि खुनाचे प्रयत्न (गेल्या पाच महिन्यातील आकडेवारी)
झोन १- ०० (खून) २ (खुनाचा प्रयत्न)
झोन २- ५ (खून) ३ (खुनाचा प्रयत्न)
झोन ३- ७ (खून) ११ (खुनाचा प्रयत्न)
झोन ४- ५ (खून) ७ (खुनाचा प्रयत्न)
झोन ५- १४ (खून) ४ (खुनाचा प्रयत्न)
हेही वाचा- चाकण औद्योगिक वसाहत कोरोनाचा हॉटस्पॉट; उद्योजकांसह कामगार भीतीच्या छायेखाली