पुणे - जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात भावानेच भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चुलत भाऊ जयनाथ मनसुख याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश नामदेव मनसुख असे 58 वर्षांच्या मृत भावाचे नाव आहे.
जमिनीचा जुना वाद
जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे प्रकाश नामदेव मनसुख व जयनाथ सोपान मनसुख या दोन चुलत भावांची वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या वाटपाबाबत पूर्वीपासून वाद होता. सोमवारी दुपारी जयनाथ मनसुख शेतात मशागत करत असताना प्रकाश शेतावर आला. यावेळी त्यांच्यात जागेच्या अधिकारावरून वाद झाला. जयनाथ याने प्रकाशच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. यामध्ये प्रकाश गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिक व नातेवाईकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हत्येचा गुन्हा दाखल
आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून जयनाथ मनसुख याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी दिली.