पुणे - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी याचा मोठा फटका उद्योगधंद्यांना बसला. अशात पुणे शहरामध्ये सर्वाधिक वाहन विक्री झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, पुणे आरटीओ हे सर्वात जास्त वाहन नोंदणी करण्यात देशात प्रथम ठरले आहे. पुण्यात गणेशोत्सव, दिवाळी, दसरा आणि नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी झाली. मात्र त्यानंतर म्हणजेच आता डिसेंबरमध्ये वाहन खरेदी मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वाहन खरेदीत पुणे शहर देशात अव्वल
पिंपरी-चिंचवडला ऑटोमोबाईलचे 'हब' म्हटले जाते. वाहन निर्मितीपासून वाहन विक्रीसाठी मोठी बाजारपेठ म्हणून ही दोन्ही शहरे महत्त्वाची आहेत. या वर्षात देशभरात विकल्या गेलेल्या वाहनांपैकी सर्वाधिक वाहन विक्री झालेले पुणे हे सर्वात वरच्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि सर्वच राज्यांच्या राजधानीच्या शहरांपेक्षा पुणे शहरात वाहनांची सर्वाधिक विक्री झाली आहे. देशातील 1 हजार 255 प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये एक जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये एक कोटी 20 लाख वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये एक लाख वाहन नोंदणीचा टप्पा ओलांडणारे पुणे आरटीओ हे देशातील एकमेव आरटीओ ठरले आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जास्त वाहन विक्री
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नवरात्र उत्सव, दसरा आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळी असल्याने दुचाकी वाहनांची विक्री जास्त झाली. मात्र नोव्हेंबरच्या शेवटी वाहन खरेदी कमी होत गेली आणि आता डिसेंबरमध्ये तर खूपच कमी प्रमाणात वाहन विक्री झाली झाली आहे, अशी माहिती पाषाणकर होंडाचे सेल्स मॅनेजर राकेश स्वामी यांनी दिली. पुण्यात पाषाणकर होंडाचे पाच आउटलेट असून पाचही ठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
दुचाकींचे शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार विक्री जोमात झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या वाहन खरेदी विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्के आहे. खासगी चारचाकी वाहनांची परिस्थिती चांगली आहे. कार विक्रीचे प्रमाण एकूण 49 टक्के आहे. परिवहन प्रणाली वरील उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या वर्षात जानेवारी ते डिसेंबरमध्ये पुणे शहरात एकूण 2 लाख 44 हजार 850 वाहनांची विक्री झाली होती. त्यामध्ये दुचाकीचे प्रमाण 67 टक्के होते तर कारचे प्रमाण 20 टक्के होते.
नागरिकांची सार्वजनिक वाहतूकीकडे पाठ
यंदा एक लाख 1 हजार 794 वाहनांची विक्री झाली असून त्यात दुचाकींचे प्रमाण 63 टक्के आणि कारचे प्रमाण 25 टक्के आहे. लॉकडाऊन नंतर चार चाकी खरेदीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड आरटीओ मध्ये नोंद होणाऱ्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे सरासरी गुणोत्तर पहिल्यास चार-पाच दुचाकी मागे एक कारची नोंदणी होती. मात्र सध्या दोन दुचाकी मागे एक कारची विक्री झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिक प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची साधने टाळत असल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळेच पीएमपी एसटी आणि खासगी वाहतूकदारांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.
1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत शहरात 18 हजार 143 दुचाकी वाहनांची विक्री
यंदाच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी झालेल्या नोंदणीचा विक्रम दिवाळीने मोडला आहे. दिवाळीत 16 हजारांहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. पुणे शहरात 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत 18 हजार 143 दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. 50 लाख लोकसंख्येच्या शहरात सुमारे 40 लाख वाहन आहेत.
कोरोनामुळे 8 महिने देशासह राज्यात आणि शहरात लॉकडाऊन असताना ही, ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांकडून दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या स्पेअर पार्टसमध्ये कधी ही कमतरता आली नाही. दुचाकी वाहनांच्याही कंपन्यांकडून कोणत्याही स्पेअर पार्टस बाबत कधीही कमतरता आली नाही, अशी माहितीही पाषाणकर ऑटोचे सेल्स मॅनेजर राकेश स्वामी यांनी दिली.
डिसेंबरमध्ये 30 ते 40 टक्केच वाहन विक्री
ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पुणे शहरात दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. मात्र डिसेंबरमध्ये हे प्रमाण खूप कमी झाले असून फक्त 30 ते 40 टक्केच वाहन विक्री झाली आहे.
हेही वाचा - सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी; 'या' त्रिसूत्रीची गरज
हेही वाचा - तलाक. तलाक.. तलाक...! पुण्यात राहणाऱ्या विवाहितेला अमेरिकेतून दिला तोंडी तलाक