पुणे - बारामतीतील कोरोनाबाधित रुग्णांची कोविड-१९ चाचणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी आता रुग्णांना पुण्यात जाण्याची गरज भासणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात 'कोरोना' प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
![corona positive tests will held in baramatis medical college](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-baramati-political-av-10060_19042020201919_1904f_1587307759_351.jpg)
बारामती शहरातील हॉटस्पॉट वगळून इतर भागात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबतचे व्यवहार सोशल डिस्टंनसिंग राखून सुरु करणे शक्य आहे का? याबाबत माहिती घेतली. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष, बेड तसेच व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे. रेशनच्या धान्याच्या वाटपाचे योग्य प्रकारे नियोजन करावे, शासकीय योजनांचा लाभ सर्वच लाभार्थ्यांना मिळेल, यादृष्टीने काळजी घेण्यात यावी, अशा सूचना केल्या.
![corona positive tests will held in baramatis medical college](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-baramati-political-av-10060_19042020201919_1904f_1587307759_705.jpg)
बारामतीमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यात येत असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचे सांगून याबाबत सर्वच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शिवभोजन थाळीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्याच्या सूचना करून, परराज्यातील कामगारांच्या निवास आणि भोजनाचा आणि स्वस्त धान्य पुरवठ्याचा आढावा घेऊन सूचना केल्या. त्याचबरोबर सर्वच खासगी डॉक्टरांनी दवाखाने उघडे ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जनाई उपसा जलसिंचन तसेच शेतीविषयक अडचणींविषयी या बैठकीत त्यांनी सूचना केल्या.