पिंपरी-चिंचवड - शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, रुग्ण संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी होम आयसोलेट असलेला रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचे म्हटले होत. मात्र, त्यांच्या याच आदेशाला महापालिकेच्या इमारतीत ठेकेदाराने केराची टोपली दाखवली आहे. शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह असलेला ठेकेदार बिलासंदर्भात जनसंपर्क कक्षात वावरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोरोनाबाधित ठेकेदाराला महापालिकेत वावरण्याची मूभा दिली आहे का? असा सवाल उपस्थित कोला जात आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कोरोनाचा वाढता आलेख पाहता शहरात उद्याने 31 मार्चपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, होम आयसोलेट असणाऱ्या रुग्णांनी देखील बाहेर फिरू नये, असं आढळल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अस बजावलं होत. मात्र तरीदेखील कोरोनाबाधित असलेला ठेकेदार बिलासंदर्भात महापालिकेत फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दोषींवर कारवाई होणार
दरम्यान याप्रकरणी जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे. तर, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड म्हणाले की, बाधित ठेकेदाराला मी भेटलेलो नाही. जे बाधित रुग्ण असतील त्यांनी कोरोनाचे नियम पाळून महापालिकेला सहकार्य करावे.