पुणे : राज्यात आजपासून एसटी महामंडळाची लालपरी पूर्ण क्षमतेने धावत आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून लालपरीचे सारथ्य करणारे चालक-वाहक हे आर्थिक संकटात सापडलेले आहेत. आता तर हे संकट आणखीनच गंभीर होत चालले आहे.
एसटीचे उत्पन्न वाढावे, यासाठी एसटी परिवहन महामंडळाकडून अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यात एसटीमधून मालवाहतूकही सुरू झाली. मात्र, मालवाहतूक करणाऱ्या चालक-वाहकांची अवस्था फारच बिकट झाली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात माल घेऊन गेल्यानंतर पाच ते सहा दिवस या चालक-वाहकांना बसमध्येच राहावे लागत आहे. ना कुठला भत्ता ना झोपायची सोय अशी अवस्था या चालकांची झाली आहे. सध्या राज्यात एसटी म्हणजे लालपरीचे सारथ्य करणाऱ्या चालक-वाहकांची संख्या 70 हजारांच्या पुढे आहे. तर, आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटीला कर्मचाऱ्यांचे पगारही दोन महिन्यांपासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जाते आहे.
गेले दोन महिने झाले पगार झालेले नाहीत. कर्जाचे हफ्ते भरायचे आहेत, घरात रेशनिंग भरायचे आहे. आमची अवस्था खूप बिकट झाली असल्याचे अनेक चालक-वाहकांनी सांगितले. सुरुवातीला आठवड्यातून दोन वेळा किंवा काम असेल तसे यावे लागायचे. काम तर आताही करावे लागत आहे, पण अजूनही पगार झालेले नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने महामंडळाकडून काहीही केले जात नसल्याची माहिती चालक विशाल जोगदंड यांनी दिली.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण झाले पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे अत्यंत अल्प आहेत. अशा या परिस्थितीतही आम्ही काम करत आहोत. आम्हाला आमच्या या आर्थिक संकटातून बाहेर काढून आमचा पगार महामंडळाने करावा, अशी मागणी यावेळी एसटी महामंडळाचे चालक शिवाजी खताळ यांनी केली आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीविरोधात शिवसेना आक्रमक; खेड पंचायत समिती इमारतीवरुन शिवसेनेचे पारंपरिक जागरण गोंधळ आंदोलन