पुणे : पुण्यातील 'फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' मध्ये आज 'द केरला स्टोरी' सिनेमाची मोफत स्क्रीनिंग करण्यात आली. या स्क्रीनिंगला चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह लेखक आणि अभिनेत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्क्रीनिंगदरम्यान जय श्रीराम, लव जिहाद अशा घोषणा देण्यात आल्या. याला एफटीआय मधील काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला. चित्रपटाला विरोध नाही, तर चित्रपटाच्या वेळी ज्या घोषणा दिल्या गेल्या त्याला विरोध आहे, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी धमकवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप : या चित्रपटाचे स्क्रीनिंग पाहायला बाहेरचे लोक कसे काय आले?, असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारला आहे. आम्हाला यातून ध्रुवीकरण होत असल्याचा संशय असल्याने आम्ही विरोध केल्याचे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. आम्ही प्रशासनाला हा प्रश्न विचारू. यापूर्वी सुद्धा अनेक चित्रपटांच्या स्क्रीनिंग झाल्या परंतु अशा घोषणा कधी कोणी दिल्या नाहीत. आम्ही आमची भूमिका अगदी शांततेने मांडत असतानाच आमच्या विरोधात घोषणाबाजी झाली. त्यामुळे आम्ही विरोध केल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. आम्हाला पोलिसांकडून देखील धमकावले जात असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.
स्क्रीनिंगचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे नाव माहिती नाही : या चित्रपटाचे स्क्रीनिंग एका संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले होते. परंतु आश्चर्य म्हणजे ती संस्था कुठली आहे याचे नाव खुद्द दिग्दर्शकांना माहित नव्हते. त्यामुळे यावरून देखील संशय निर्माण होत असल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हा चित्रपट मोफत दाखवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा चालवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी निदर्शने केल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणली. सध्या तणाव मिटला आहे.
दिग्दर्शकांचे स्पष्टीकरण : चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर दिग्दर्शक सुदीप्त सेन यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. हा चित्रपट कुठल्याही धर्माच्या किंवा समाजाच्या विरोधात नाही. आम्ही फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी विद्यार्थी असल्याने आम्हाला चित्रपटाच्या स्क्रीनिंग साठी बोलवण्यात आले होते. विरोध करणाऱ्यांना विरोध करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी आल्यानंतर प्रथम त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आमच्यात कुठलाही वाद किंवा संघर्ष झाला नाही. परंतु चित्रपटाला चित्रपटासारखं पाहावं अशी आमची अपेक्षा आहे. हा चित्रपट केवळ दहशतवाद आणि अतिरेक्यांविरोधात आहे. हा चित्रपट कुठल्याही धर्म आणि समाजाच्या विरोधात नसल्याचे सुदीप्त सेन यांनी सांगितले.
हेही वाचा :