पुणे Container overturns : मुंबई पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळा आणि खंडाळा दरम्यान एक भरधाव वेगातील कंटेनर पलटी होऊन त्याची धडक दोन दुचाकी गाड्यांना बसली. या अपघातात एका लहान मुलीसह दोन जणांचा मृत्यू झाला. इतर तीन जण जखमी झाले आहेत. आज दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची अद्याप माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या अपघाताच्या मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना दिवसभर जाण्यास बंदी असताना देखील आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास पुण्याच्या बाजूकडून मुंबईच्या दिशेने एक मोठा कंटेनर जात होता. लोणावळा शहरातून जुन्या महामार्गाने पुढे गेल्यानंतर मयूर हॉटेल समोरील वळणावर हा कंटेनर अचानक पलटी झाला. तसंच घसरत पुढे जाऊन लोणावळ्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकी गाड्यांना त्याची धडक बसली. या अपघातात एक लहान मुलगी आणि दोन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मूल तसंच दोघेजण जखमी झाले आहेत. अतिशय भीषण असा हा अपघात आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले होते. तत्काळ जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं असून अपघातात तीन जनांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लोणावळा शहरातून अवजड वाहनांना जाण्यास बंदी असताना देखील हा कंटेनर जुन्या हायवेने जात होता. त्याच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी लोणावळाकरचे किरण गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड म्हणाले, जिल्हाधिकारी पुणे यांनी दिवसा लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातलेली असताना देखील ही अवजड वाहने आतमध्ये येतात कशी, महामार्ग पोलीस आणि लोणावळा पोलीस यांनी वळवण येथील एन्ट्री पॉइंटवरून ही वाहने एक्स्प्रेसवेवर वळवणे गरजेचे आहे. नियम पाळले जात नसल्याने आज सणासुदीच्या दिवशी निष्पाप नागरिकांचे जीव गेले आहेत.