पुणे - सरकारचा प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करण्याचा उद्देश आहे. देशात सध्या बेरोजगारी वाढत असून या बेरोजगारीमध्ये भर टाकली जात आहे. सरकार काही घराण्याचे हितसंबंध जपत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
पुण्यातील खडकी आयुध निर्माण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. थोरात यांनी शनिवारी त्या कामगारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. सरकार मंदीऐवजी भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. सरकार साम दाम दंड भेद सर्वांचा वापर करत आहे. निवडणुका समोर असताना लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या घटना घडत असल्याचे थोरात म्हणाले.
काँग्रेसने यापूर्वी पूर हाताळला आहे. मात्र, लोक पाण्यात बुडत असताना यांची जल्लोष यात्रा सुरू होती. सरकारला गांभीर्य ओळखता न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी सरकारने माफी मागितली पाहिजे, असेही थोरात म्हणाले.