पुणे - अर्थव्यवस्थेवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीतर देशात अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊन कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मजूर, कामगार, गरीब कुटुंबाना थेट पैसे द्या. इतर देशात खासगी कामगारांना त्यांच्या सरकारने पगार दिला, तसा पगार सरकारने द्यावा अन्यथा अर्थव्यवस्थेचे चक्र फिरणार नाही. ढासळलेली अर्थव्यवस्था सांभाळण्याचे काम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आवाक्या बाहेरचे आहे. ते त्यांना जमणार नाही. पंतप्रधानांनी सीतारामन यांच्याकडून अर्थमंत्र्याचा भार काढून घ्यावा, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
कोरोना ही जागतिक महामारी असल्याचे 11 मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते. मात्र, केंद्र सरकारने उपाययोजना करायला 25 मार्चपर्यंत वेळ घेतला. केंद्र सरकार गोंधळलेले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वेळीच बंद न केल्याने कोरोनाचा महाराष्ट्रात उद्रेक झाला, असा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारने जाहीर केलेले आर्थिक पकेज फसवे आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या एक टक्का पॅकेज दिले, ते पुरेसे नाही. किमान 10 टक्के पैसा सरकारने दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सरकारने आर्थिक उपाययोजना केलेल्या नाहीत. एकीकडे आरबीआयसह जगभरातील अर्थसंस्था भारताचा आर्थिक विकास दर निगेटिव्हमध्ये जाईल, असा अंदाज व्यक्त करत आहे. मात्र, पंतप्रधान आपला विकास दर वाढणार असल्याचे सांगतात, ते कसे हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही चव्हाण म्हणाले.