पुणे - गुजरात काँग्रेसचे प्रभारी व माजी खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आज (दि. 29 एप्रिल) पत्रकार परिषद घेत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.
विश्वजीत कदम म्हणाले, 19 एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर 22 तारखेला त्यांचा स्वॅब टेस्ट पॉझिटीव्ह आला. 23 तारखेला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात भरती झाले. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे 25 तारखेला त्यांना अतिदक्षता विभागात आणि त्यानंतर 28 तारखेला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले.
कदम म्हणाले, सातव यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. जहांगीर रुग्णालयाचे डॉक्टर त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. आवश्यकतेनुसार त्यांच्यावर सर्व उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. कुटूंबातील सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकता असल्यास त्यांना मुंबईला हालवण्यात येईल.
राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू सहकारी आहेत. त्यासोबत ते हिंगोलीचे माजी खासदार ही आहेत. 2014 ला जेव्हा देशभरात मोदी लाट होती तेव्हा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. काँग्रेस आणि गांधी घराण्याशी निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरात काँग्रेसचे प्रभारी पद देण्यात आले होते. राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे कळाल्यानंतर स्वतः राहुल गांधी यांनी फोन करून डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे.
हेही वाचा -आळंदी पोलिसांच्या आव्हानाला चारशे पेक्षा अधिक रक्तदात्यांची साथ